Ashish Shelar – शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व कुतूहल वाढवण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. ही योजना यापुढे आता थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे चालवण्यात येणार आहे. अशी घोषणा तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत आज केली. त्यासाठी राज्य शासनावर अंदाजे १९२ कोटी रुपयांचा आर्थिक भार अपेक्षित असल्याचे शेलार म्हणाले.
हे केंद्र ज्ञानवृद्धीचे केंद्र ठरेल…
दरम्यान, याची अंमलबजावणी व नियंत्रणासाठी एक व्यावसायिक चमू तयार केला जाईल ज्यात क्यूरेटर, अभियंते, व निवृत्त अधिकारी यांचा समावेश असेल. यासाठी केंद्र शासन, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद व अन्य संस्थांचा सहभाग असेल, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले. SIAC ही उपक्रम योजना ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि NEP-२०२० ला पूरक ठरणारी एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. ही केंद्रे केवळ शाळांसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी ज्ञानवृद्धीचे केंद्र ठरणार आहेत, सर्व जिल्ह्यांमध्ये याचे विस्तार केल्यास भविष्यातील विज्ञानस्नेही महाराष्ट्र घडवणे शक्य आहे.
प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान व नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्र उभारणार
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत, शालेय शिक्षण कार्यक्रमाला हा पूरक कार्यक्रम असून विज्ञान शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, एक विज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्र उभारणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.





