“जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद वाटत नाही”; आमदार गोपीचंद पडळकरांची मुक्ताफळे

Written by:Rohit Shinde
Published:
आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने जयंत पाटलांवर सडकून टीका करत असतात. आता यामध्ये जयंत पाटलांवर बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.
“जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद वाटत नाही”; आमदार गोपीचंद पडळकरांची मुक्ताफळे

जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात अनेक मुद्द्यांवरून संघर्ष झाला आहे. विशेषतः धनगर समाज, आरक्षण, शेतकरी प्रश्न आणि सत्ता-संघर्ष या विषयांवरून दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसतात. पडळकर हे अनेकदा पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करतात, तर पाटीलही त्यांना प्रत्युत्तर देण्यास मागे हटत नाहीत.मात्र आता गोपीचंद पडळकरांनी थेट पातळी सोडून टीका केली आहे.

गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली!

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना सगळ्याच मर्यादा ओलांडल्याचं दिसून आलं. जयंत पाटलांनी आपल्याला एका प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं. जयंत पाटलांनी आपल्याला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला. ही राजारामबापू पाटील यांची औलाद असेल असं वाटत नाही, काहीतरी गडबड आहे अशा खालच्या शब्दात पडळकरांनी केला.

पडळकरांची सातत्याने बेलगाम वक्तव्ये

सांगलीमध्ये जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हा वाद चांगलाच पेटल्याचं दिसून येतंय. गोपीचंद पडळकरांनी या आधीही सातत्याने जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्याला जयंत पाटलांनीही उत्तर दिलं. पण गोपीचंद पडळकरांनी जतमध्ये केलेल्या वक्तव्यावर आता वाद होण्याची शक्यता आहे. या सततच्या आरोप-प्रत्यारोपामुळे दोघांचा वैयक्तिक वाद राजकीय रंग घेतो. ग्रामीण भागात व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या वादाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. दोन्ही नेत्यांचा संघर्ष हा केवळ राजकीय न राहता समाजघटकांच्या भावनांनाही स्पर्श करणारा ठरतो, म्हणूनच या वादाकडे माध्यमे व जनता बारकाईने लक्ष देतात. आता पडळकरांनी उधळलेल्या मुक्ताफळांना जयंत पाटील नेमके काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.