मुंबई- पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या झाल्या, तर मुंबईत निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायेत, असं वादग्रस्त विधान मंत्री आशिष शेलार यांनी केलंय. यावरुन राजकीय वाद रंगलाय. भीती पसरवून मतं मिळवण्यासाठी हे सगळं करण्यात येत असल्याची टीकाही शेलारांनी केलीय. तर पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत, असा सवाल करत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्यावर टीका केलीय.

मराठी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना खळखट्याक करुन उत्तर देणाऱ्या मनसैनिकांची तुलना थेट दहशतवाद्यांशी करण्यात आलीय. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी मनसैनिकांवर जोरदार टीका केली आहे. भीती निर्माण करुन त्यातून मतं मिळवण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचं त्यांचं म्हणणंय.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

ठाकरे बंधू एकत्र आले हे चांगलंच झालं, असं सांगतानाच मेळाव्यातील ठाकरे बंधूंच्या भाषणावर त्यांनी टीका केली.
ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते गुद्द्यांवर येतात असं सांगतानाच मुंबईत, राज्यात कुणीही घाबरण्याची गरज नसल्याचंही शेलार म्हणालेत. खर तर दोन घटनेची तुलना करता येत नाही पण या सगळ्या गोष्टीची मला उद्विग्नता येते. पहेलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय!इंग्रजांची रणनीती होती तोडा आणि राज्य करा, आता काही पक्षांची रणनीती आहे भीती पसरवा आणि स्वतःची मत मिळवा, अशी टीकाही त्यांनी केली.आमची सत्ता रस्त्यावर आहे या राज ठाकरेंच्या वक्तव्यालाही मग रस्त्यावर गोट्या खेळा असं सांगत शेलारांनी उत्तर दिलंय.

विरोधकांचं काय प्रत्युत्तर?

मनसैनिकांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांशी करणाऱ्या शेलारांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. भाजपा तरी दुसरं काय करतं असा सवाल मनसेनं केलाय. तर पहलगाम हल्ल्यातले दहशतवादी आहेत कुठे, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय.

मराठी विरुद्ध अमराठी मुद्दा तापणार?

मिरारोडमध्ये मराठी बोलण्यावरुन एका व्यापाऱ्याला मनसैनिकांची चोप दिला होता. त्यावरुन तिथलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मिरारोडच्या व्यापारी संघटनांनी 3 जुलैला मोर्चा काढला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मराठी भाषिकही आता मोर्चा काढणार आहेत. पहिलीपासून हिंदी भाषेच्या वादासोबत हिंदी-मराठीचा वाद तापताना दिसतोय. यावरुन राजकारणही रंगतंय. शेलारांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर आगामी काळात ठाकरे बंधू विरुद्ध भाजपा असा संघर्ष रंगेल अशी शक्यता आता वर्तवण्यात येतेय.