5 जुलैच्या मोर्चात मुंबईकरांनी सहभागी व्हावी यासाठी मनसेनं रेल्वेत वाटली पत्रकं, काय केलं आवाहन?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मोर्चावर ठाम असणाऱ्या दोन्ही ठाकरे बंधू मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहेत, त्यामुळे सरकार या मोर्चाला परवानगी देणार का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
5 जुलैच्या मोर्चात मुंबईकरांनी सहभागी व्हावी यासाठी मनसेनं रेल्वेत वाटली पत्रकं, काय केलं आवाहन?

MNS-Shivsena Morcha – सध्या राज्यात तिसरी भाषा आणि हिंदी सक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तिसरी भाषा सक्तीची यावरून विरोधकांनी मोठा विरोध केला असून, या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाच जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात तमाम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी, सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी  मोर्चात सहभागी होऊन सरकारचा निषेध करावा, असं आवाहन मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

रेल्वेत पत्रकं वाटली…

दरम्यान, ही लढाई मराठी माणसासाठी… मराठी भाषेसाठी आहे… त्यामुळे यात कुठल्याही क्षेत्रातील आणि कुठल्याही जाती, धर्मातील मुंबईकरांनी सहभागी व्हावं. कारण ही लढाई मराठी माणसांची आणि मराठी भाषेसाठी आहे. आम्ही मुंबईकरांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. म्हणून आज आम्ही रेल्वेत पत्रकं वाटली आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मराठी भाषेसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील मोर्चात सहभावी व्हावे, असं आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे.

भूमिका आकलनीय…

तर हा मोर्चा केवळ आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढण्यात येत आहे. यांना मराठी माणसाचं किंवा मराठी भाषेवरती प्रेम नाही तर हे तिसऱ्या भाषेचं राजकारण करतात, अशी टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. दुसरीकडे पहिली ते तिसरीपर्यंत भाषा ही कोणती सक्तीची नाही. केवळ मौखिक शिक्षण आहे. तिसरीनंतर तिसरी भाषा ऐच्छिक असल्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.