स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे-सेना युती, खासदार संजय राऊत यांची घोषणा

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
राज उद्धव एकत्र येणार का? यावर जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र आज मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढू, असे संजय राऊत यांनी जाहीर करत युतीची घोषणा केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे-सेना युती, खासदार संजय राऊत यांची घोषणा

Uddhav-Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत ठाकरे बंधू एकत्र येणं हे फार काही अवघड काम नाही, असे सांगत शिवसेना मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर हिंदी भाषा सक्तीला विरोध करत तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. यानंतर दोन बंधू एकत्र निवडणूक लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती,

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली- नाशिक महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र रिंगणात उतरणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केली.

अनेक ठिकाणी येणार एकत्र…

दरम्यान, हिंदी सक्तीच्या मुद्दावरुन ठाकरे बंधूंच्या लढ्याला यश आले आणि महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला. त्यानंतर वरळीतील डोम मध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी राज्यभरातून जोरदार मागणी होऊ लागली, पोस्टर्स बॅनर्स झळकले. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले आणि राज उद्धव एकत्र येणार यावर जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र आज मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढू, असे संजय राऊत यांनी जाहीर केले. आज राऊत नाशिकमध्ये बोलताना ही घोषणा केली.

मराठी एकजूटीसाठी ठाकरे बंधूं एकत्र…

आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत मुंबई महानगरपालिकेची निवडणुका जिंकणार अशी घोषणा केली. तसेच महाराष्ट्र, मराठी एकजूटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसल्याचेही राऊत यांनी सांगितले.