सातारा जिल्ह्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Written by:Rohit Shinde
Published:
सातारा जिल्ह्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून पुढील २-३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार

तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून सतत दीड महिना पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामंही खोळंबली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर या तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरु लागली आहे. अनेक शेतकऱ्यांची पावसाळापूर्व मशागतीची कामं, तसेच पावसाळी घेतली जाणारी पिकं अद्याप घेतली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या परिसरात 5 हजार 153 मिलिमिटर पाऊस फक्त दीड महिन्यात झाला असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे काही भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्ह्यातील पाटण महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील 334 जिल्हा परिषद शाळांना सुमारे दीड महिन्याची पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 2 ऑगस्ट ला या शाळा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 1 जुलैपासून या शाळांना सुट्टी लागली असून आता 12 ऑगस्टला या शाळा भरणार आहेत.