Bhaskar Jadhav – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज दुसरा दिवशी विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्ज यावरून सरकारच्या विरोधात आंदोलन केले. विधानसभेत प्रश्नोत्तरांनंतर विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाल्यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना आज निलंबन केले. तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याविना जाणार का? यावरुन आमदार भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केली.
निर्णय का होत नाही?
दरम्यान, ही गोष्ट खरी आहे. एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के ज्या पक्षाचे सदस्यांची असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेते पण दिलं जातं, असं जे सांगितले जात होतं ते खरं नाही. हे आम्ही नियमाने, कायद्याने सिद्ध करून दाखवले आहे. विधिमंडळ सचिवांकडून म्हणजे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्या पत्राचे उत्तर देखील घेतलंय. आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या वतीने आणि तिन्ही पक्षांच्या संमतीने माझ्या नावाची निवड करण्यात आली. त्याबाबतचे पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्षांना भेटलो. मात्र अद्यापदेखील त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची घोषणा केलेली नाही.
विरोधी पक्षनेता कधी मिळणार?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत राज्यपालांचीदेखील भेट घेतली होती. मात्र, आता पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस उजाडला तरी अद्यापही विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत निर्णय झालेला नाही. नवीन सरकार स्थापनेनंतर सध्या तिसरे अधिवेशन सुरू आहे. मात्र, हे तिसरे अधिवेशनदेखील आता विरोधी पक्षनेत्याविना सुरू असल्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळाला विरोधी पक्षनेता कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे नाव अध्यक्षांना देण्यात आले आहे. मात्र त्याबाबत निर्णय न झाल्याने आमदार भास्कर जाधव यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलीय.





