तब्बल चार दशकांपासून सुरु असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांनी दिलेला लढा न्यायाच्या अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. आज संध्याकाळी मुंबईत या संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर येत आहे. बारच्या सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. या बैठकीचा प्राथमिक उद्देश विचारविनिमय करणे, चर्चा करणे आणि औपचारिक ठराव मंजूर करणे आहे. त्यामुळे या खंडपीठाच्या दृष्टीने मुंबईत आज काय हालचाली होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरन्यायाधीश गवई खंडपीठाबाबत सकारात्मक
26 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सत्कार समारंभात बोलताना भारताचे 52 वे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे म्हणाले होते. प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले होते. जेव्हा जेव्हा जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणी केली जाते तेव्हा मी त्याला पाठिंबा दिला आहे आणि औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण दिले आहे, असेही सरन्यायाधीश गवई म्हणाले होते.
कोल्हापूर खंडपीठाचा मार्ग मोकळा होणार?
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोल्हापूरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सरकार सकारात्मक झाल्याने या प्रक्रियेला वेग आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच असण्याची दीर्घकाळापासून मागणी आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर हायकोर्टाचे सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी वकिलांच्या शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींसमोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आयोजित केले होते.
तब्बल तीन वर्षांनी ही बैठक झाली जेव्हा शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली होती, ज्यांनी या मागणीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी केली होती. त्यानंतरच या खंडपीठाच्या मागणीला वेग आला आहे. त्यामुळे यावर लवकरच काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.






