Marathi News

कोस्टल रोडचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला, आता प्रवास होणार सुसाट

Written by:Rohit Shinde
Published:
कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जे. के. कपूर चौक येथून सुरू होणाऱ्या भुयीरी मार्गाचे काम पूर्ण झाले आणि हा मार्ग खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात आला आहे.
कोस्टल रोडचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला, आता प्रवास होणार सुसाट

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता अर्थात मुंबईचा कोस्टल रोड वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आता हा मार्ग पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे. कारण उर्वरीत भूमिगत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून हा भुयारी मार्ग आता वाहतूकीसाठी खुला झाला आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार

भूमिगत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. आता हा भूमिगत मार्गही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जे. के. कपूर चौक येथून सुरू होणाऱ्या भुयीरी मार्गाचे काम पूर्ण झाले आणि हा मार्ग खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात आला आहे. कोस्टल रोडच्या उर्वरित दोन आंतरमार्गिका सुद्धा खुल्या करण्यात आल्याने मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत 10.58 किलोमीटरचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे.
या दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आंतरमार्गिका बदल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणजे वरळी आणि प्रभादेवी येथून नरिमन पॉईंट तसेच वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने जाण्यासाठी जे. के. कपूर चौक ते खान अब्दुल गफार खा मार्ग हा भुयीरमी मार्ग तयार करण्यात आला असून आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या भूमिगत मार्गाची लांबी 520 मीटर इतकी आहे. या भुयारी मार्गासोबतच मरीन ड्राईव्हकडे जाणारी एक आणि दुसरी वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारी आंतरमार्गिका सुद्धा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे कोस्टल रोडच्या सर्वच्या सर्व 18 आंतरमार्गिका खुल्या झाल्या आहेत.

कोस्टल रोडचे वाहतूक नियमनातील महत्व

मुंबईतील कोस्टल रोड हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या रस्त्यामुळे दक्षिण मुंबईपासून पश्चिम उपनगरांपर्यंतचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक दडपण कमी होईल. कोस्टल रोडमुळे इंधन आणि वेळ वाचेल, तसेच प्रदूषणातही घट होईल. वाहतुकीचा प्रवाह सुलभ होऊन पर्याय उपलब्ध झाल्याने नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायक होईल. या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी सुंदर रस्ते, हरितक्षेत्रे व सायकल ट्रॅकचीही सुविधा मिळणार आहे. मुंबईच्या वाढत्या वाहतूक समस्येवर कोस्टल रोड एक प्रभावी उपाय ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews