छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार हजूर साहिब नांदेडपर्यंत करण्यात आला असून विस्तारित गाडीचे उद्घाटन 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या करिता एक उद्घाटन विशेष गाडी 26 ऑगस्ट ला चालविण्यात येईल. या उद्घाटन विशेष गाडीचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.

मुंबई-नांदेड धावणार वंदे भारत

वंदे भारत एक्सप्रेसने – महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास 30 डिसेंबर 2023 पासून सुरु केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणार्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार हजूर साहिब नांदेडपर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारित गाडीचे उद्घाटन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या करिता एक उद्घाटन विशेष गाडी 26 ऑगस्ट ला चालविण्यात येईल.

27 ऑगस्टपासून धावणार गाडी

या विस्तारित गाडीची नियमित सेवा दिनांक 27 ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड आणि दिनांक 28 ऑगस्ट पासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी सुरु होईल. गाडी संख्या 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस हि गाडी 27 ऑगस्ट 2025 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून गुरुवार वगळता रोज दुपारी 13.10 वाजता सुटेल आणि दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवर थांबून हजूर साहिब नांदेड येथे रात्री 22.50 वाजता पोहोचेल.

ही गाडी हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर 09 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. ज्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार मिळून एकूण 20 डब्बे असतील. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये 8 डब्बे होते. त्यात वाढ करून 20 डब्बे करण्यात आले आहेत.