मुंबईचा महापौर भाजपचाच, पक्षश्रेष्ठींनी केलं स्पष्ट; मुंबईतल्या कामगिरीवरुन भाजप-शिंदे सेनेत ब्लेम गेम

Written by:Smita Gangurde
Published:
मुंबईत युतीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही, यावरुन आता ब्लेम गेमही सुरु झालाय.
मुंबईचा महापौर भाजपचाच, पक्षश्रेष्ठींनी केलं स्पष्ट; मुंबईतल्या कामगिरीवरुन भाजप-शिंदे सेनेत ब्लेम गेम

मुंबई- मुंबईत भाजपचाच महापौर होणार, हे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केलं आहे. मात्र महापौरपद मिळवताना मित्रपक्षांत कटुता निर्माण होऊ देऊ नका, असा संदेशही देण्यात आलाय. दुसरीकडे शिंदे शिवसेनेमुळे मुंबईत भाजपाचं नुकसान झाल्याची तक्रार मुंबईतील भाजपा नेत्यांनी दिल्लीश्वरांना केलीय. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेच्या पराभूत नगरसेवकांनी भाजपमुळे पराभव झाल्याचा दावा केलाय.

मुंबईच्या महापौरपदाचा तिढा सुटला

मुंबईत महायुतीला मिळालेल्या विजयानंतर महापौर कोण होणार, हा तिढा आता जवळपास सुटलाय. शिंदे शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्स, महापौरदाच्या दाव्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर असं सांगत महापौरपदावर दावा केला होता.या सगळ्या घडामोडींवंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार, हे स्पष्ट केलंय.

भाजप पक्षश्रेष्ठींचे काय आदेश?

१. मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका
२. भाजप हा मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर हे निर्णायक यश मिळालंय.
३. महापौरपदावर भाजपचाच हक्क कसा आहे, हे मित्रपक्षांना पटवून द्या.
४. हे करताना कोणत्याही प्रकारची कटुता येणार नाही, याची काळजी घ्या

हा संदेश पक्षश्रेष्ठींनी देऊन मुंबईतील महापौरपदाचा वाद मिटवल्याचं मानण्यात येतंय. दुसरीकडे भाजप श्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी राहुल शेवाळे दिल्लीत दाखल झालेत. भाजपा नेत्यांशी चर्चा करताना महापौरपद आणि स्थआयी समितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदे शिवसेनेची रणनीती काय?

१. महापौरपदावर दावा करत शिंदे शिवसेनेचा भाजपवर दबाव
२. महापौरपद मिळाले नाही, तर स्थायी समितीसाठी राहणार आग्रही
३. सुधार, शिक्षण, बेस्ट आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवरही वर्चस्वासाठी प्रयत्न
४. आर्थिक सूत्रे असलेल्या समित्यांसाठी आग्रही भूमिका

दिल्लीतल्या या घडामोडींवर टीका करण्याची संधीच या निमित्तानं ठाकरे शिवसेनेला मिळालीय. मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी एकनाथ शिंदेंना अमित शहा यांच्या पायाशी जावं लागतं हे अपमानकारक असल्याची टीका केलीय.

भाजप- शिंदे शिवसेनेत ब्लेम गेम

मुंबईत युतीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही, यावरुन आता ब्लेम गेमही सुरु झालाय.

१. मुंबईतील कामगिरीवरुन भाजप-शिंदे शिवसेनेत नाराजी
२. शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचे नुकसान, मुंबई भाजप नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार
३. शिंदेंच्या खराब स्ट्राईक रेटचा परिणाम युतीच्या जागांवर झाला, भाजप नेत्यांची भूमिका
४. भाजपानं जास्त जाढा लढल्या असत्या तर 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, भाजप नेत्यांना विश्वास
५. शिंदे शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही भाजप नेते नाराज
5. भाजपामुळे पराभव स्वीकारावा लागला, शिंदे शिवसेनेच्या पराभीत उमेदवार सदा सरवणकरांचा आरोप
6. शिंदे शिवसेनेचे नेते पराभूत व्हावेत, यासाठी भाजपच्या टोळ्या फिरत असल्याचा आरोप

मुख्यमंत्र्यांना समन्वय साधावा लागणार

मुंबईवरुन युतीत सुरु झालेली ही धुसफूस येत्या काळात काय रुप घेणार हे आता पाहावं लागणार आहे. मुंबईच्या महापौरपदाचा ट्विस्ट आता दिल्लीतल्या चर्चेनंतर संपल्याचं मानण्यात येतंय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता महापौरपदाचा संदेश एकनाथ शिंदे यांना पटवून द्यावा लागेल.
त्या बदल्यात मुंबई महापालिकेतील इतर महत्त्वाची पदं किंवा राज्यातील अन्य महापालिकांमध्ये समन्वयाने तोडगा काढावा लागणार आहे.

 

Follow Us :GoogleNews