मुंबई – मुंबई महापौरपदाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार हे स्पष्ट झालंय. दिल्लीत अमित साटम आणि राहुल शेवाळे यांची चर्चा झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हेच अंतिम निर्णय घेतील असं सांगण्यात आलंय. तर एकनाथ शिंदेही दोन दिवसांत दिल्लीत जाणार आहेत. दरम्यान मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पडलीय.
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी स्प्ष्ट केल्यानंतर आता महापौरपदाच्या घडामोडी दिल्लीत सुरु झाल्या आहेत.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्यात मंगळवारी चर्चा झाली.
यात मुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.
एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करणार
यातच एकनाथ शिंदेही येत्या एक दोन दिवसांत दिल्ली दौरा करणार असल्याचं सांगण्यात येतंय. या दौऱ्यात मुंबईच्या महापौरपदाबाबत त्यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी चर्चा होणार आहे. मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय सध्या दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं भाजपकडून आलंय. तर भाजपत शिंदेंना कुणी विचारत नसून, मुंबईच्या महापौरपदासाठी त्यांना दिल्लीत जाऊन बसावं लागतंय अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.
महायुतीत वादाची ठिणगी
दुसरीकडे मुंबईत निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडलीय. भाजपच्या काही नेत्यांमुळे पराभव झाल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी केलाय. शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचा पराभव व्हावा, यासाठी भाजपातील एक टोळकं कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांनी केलेल्या आरोपांची सतत्या तपासून पाहण्यात येईल, असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी स्पष्ट केलंय.
दुसरीकडे भाजपा कार्यकर्ते समाधान सरवणकर यांच्या आरोपांनंतर आक्रमक झालेत. सरवणकर खोटे आरोप करत असून त्यांच्या विरोधात सायबर सेलमध्ये तक्रारही करणार आहेत. ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर टीका केलीय. सरवणकरांच्या निमित्तानं महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं मानण्यात येतंय.
भविष्यात काय होणार?
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेनंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी नवे वाद बाहेर येण्याची शक्यता आहे.
महायुतीतले हे वाद किती विकोपाला जातात, यावर भविष्यात बरचं काही अवलंबून असेल.





