Mumbai Municipal Corporation Election 2026 : दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२५ सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महानगरपालिकेतील २२७ प्रभागांपैकी हा असा एकमेव प्रभाग आहे जिथं महायुतीचे दोन मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही लढत केवळ दोन पक्षांमधील नाही तर राजकीय वर्चस्व, स्थानिक पकड आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी आहे.

भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट, कोण आहेत २२५ चे उमेदवार?

या हाय-प्रोफाइल वॉर्डमध्ये भाजपने हर्षित नरवेकर यांना मैदानात उतरवलं आहे. हर्षिता नरवेकर या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान नगरसेवक सुजाता सनप निवडणूक लढवत आहेत. त्या या वॉर्डातून दोन वेळा जिंकून आल्या आहेत. दक्षिण मुंबईता हा वॉर्ड गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेचा गड मानला गेला आहे. अशात भाजपने येथून शिवसेनेविरोधात उमेदवार उभा करून एका राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसतं.

मैत्रीपूर्ण लढत की राजकीय संघर्ष?

महायुतीचे नेते याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. मात्र प्रत्यक्षात चित्र काहीतरी वेगळंच आहे. दोन्ही उमेदवार एकमेकांवर तीव्र हल्ले करताना दिसत आहेत. विद्यमान नगरसेविका सुजाता सानप यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्हाला निवडणूक लढवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. याला मैत्रीपूर्ण लढत म्हटलं जात आहे. परंतु खरे चित्र १६ जानेवारी रोजी समोर येईल. हा माझा स्थानिक प्रभाग आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, हा प्रभाग सर्व धर्म आणि समुदायांचे प्रतिनिधित्व करतो. यापूर्वीही जेव्हा भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढली होती तेव्हाही शिवसेना जिंकली होती. मला तिसऱ्या टर्मबद्दल पूर्ण विश्वास आहे. स्थानिक समस्या सर्वात महत्त्वाच्या आहेत – रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकास.” आमचं ध्येय हे समाजसेवा आहे.