BMC Election 2026 : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जशजशी जवळ येत आहे तसतशी उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची धाकधूक वाढली आहे. उमेदवारांच्या परीक्षेचा निकाल अवघ्या काही दिवसात समोर येईल. तत्पूर्वी त्यांच्या प्रतिज्ञापत्राची चर्चा आहे. यामधून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात कितीने वाढ झाली याचा उल्लेख आहे. गेल्या पाच ते ७ वर्षात अनेक उमेदवारांनी कोटीच्या उड्डाणं घेतली आहेत. कित्येकांच्या उत्पन्नात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. मात्र असेही काही उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती अवघी काही हजारांवर आहे. तर काहींच्या संपत्तीत घट झाली आहे.
शरद पवार (माजी) गटातील उमेदवाराची संपत्ती घटली
अशी परिस्थिती असताना शरद पवार गटात (माजी) असलेल्या एका उमेदवाराच्या उत्पन्नात मात्र पाच लाखांची घट झाल्याचं समोर आलं आहे. या उमेदवाराने गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष आणि महापालिकेच्या गटनेत्या राहिलेल्या राखी जाधव त्यांच्या उत्पन्नावरुन सध्या चर्चेत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच लाखांची घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ च्या निवडणुकीत राखी जाधव यांची संपत्ती ३ कोटी ८५ लाखांच्या घरात होती. आता त्यांची संपत्ती ३ कोटी ८० लाख ६७ हजार ३११ रुपये असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. यानुसार त्यांच्या संपत्तीत ५ लाखांची घट झाली आहे.
या उमेदवाराची संपत्ती अवघी ६४ हजार
राखी जाधव यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या प्रभाग क्रमांक १३१ नायडू कॉलनीतून त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. तर दुसरीकडे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग क्रमांक ८३ बामणपाडामधील आम आदमी पक्षाच्या उमेदवार प्रीती पाडाव यांची संपत्ती अवघे ६४ हजार रुपये आहे. त्यांनी बीएससीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.





