गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना मुंबई महापालिकेने गणेश मंडळांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बई महापालिकेने मंडप उभारण्यासाठी रस्ता खोदल्यास आकारण्यात येणारा १५ हजार रुपयांचा भरमसाठ दंड रद्द केला आहे. त्याऐवजी 2 हजार रुपयांचा दरच कायम ठेवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून तातडीने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली. यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
१५ हजारांचा दंड आता २ हजारांवर
२०१७ पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डा खोदल्यास २ हजार रुपये दंड (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) आकारला जात होता. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई महापालिकेच्या नव्या नियमावलीनुसार, हा दंड थेट १५ हजार रुपये करण्यात आला होता. अचानक झालेल्या या वाढीमुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. मुंबईतील लहान-मोठ्या मंडळांना हा खर्च परवडणारा नसल्याने, त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली होती.
‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा’
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंडळांना एक महत्त्वाचे आवाहनही केले आहे. मुंबईत सध्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण सुरू आहे. त्यामुळे मंडळांनी शक्यतो काँक्रीटचे रस्ते खोदू नयेत. त्याऐवजी, मंडप उभारणीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे त्यांनी सुचवले आहे. यामुळे रस्ते खराब होणार नाहीत आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही टाळता येईल. एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून या विषयावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ न करता ती जुन्या दराप्रमाणे म्हणजेच २ हजार रुपयेच ठेवावी असे स्पष्ट निर्देश दिले. या निर्णयामुळे अनेक छोट्या गणेश मंडळांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार आहे.






