आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईची झाली तुंबई; पावसामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झालीये. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून कामांवर जाणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईची झाली तुंबई; पावसामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल

मुंबई शहरासह उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबईकरांना विशेष म्हणजे नोकरदार मंडळींना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला आहे. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थांना देखील चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

पावसामुळे नागरिकांची तारांबळ

अनेक चाकरमान्यांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तारांबळ उडल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळपासून मुंबई उपनगरात, विशेषतः अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले आणि सांताक्रूझ भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कांदिवली-मालाड पश्चिम भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र सततच्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लिंकिंग रोडवरही पावसाचा परिणाम दिसून येत आहे. मालाड-कांदिवली लिंकिंग रोडवर मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

वसई-विरारमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज ढगाळ वातावरण आहे. सध्या शहरात कुठेही पाणी साचलेले नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे. विरार पूर्वेकडील विवा जहांगीर परिसरात पावसाची रिमझिम सुरु आहे.मीरा-भाईंदरमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शहरात कुठेही पाणी साचले नसून, वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. सततच्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.

पुढील काही दिवस पावसाचे

हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. 21 ते 26 जुलै हा चांगलाच पावसाचा काळ असेल असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात या काळात पावसाची स्थिती उत्तम राहील, असा अंदाज आहे. कोकणात पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून कामांवर जाणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झालीये.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews