राज्यात सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. मुंबई विद्यापीठाने आपल्या संलग्न सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या आज, मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यामध्ये आता विद्यापीठ पुढे नेमका काय निर्णय घेते , हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
परीक्षा पुढे ढकलल्या; नवी तारीख समोर
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार विद्यापीठाने देखील नियोजित परीक्षा पुढे ढकलत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या परीक्षा आता 23 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अद्ययावत वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुंबई आणि कोकण विभागासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत असून त्याचा परिणाम मुंबई आणि परिसरावर होत आहे. त्यामुळे मंगळवारीही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पावसाचा जोर कायम राहणार!
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता असून, पुढील २-३ दिवस राज्यातील काही भागात म्हणजे कोकण व घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासापासून मुंबईसह राज्यभर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर कोकण आणि घाट माथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील 24 तास मुसळधार व अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर
या पावसामुळे मुंबई, ठाण्यातील दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळं रस्त्यावरील वाहतुक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालय गाठताना उशीर होत आहे. मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा परिणाम अनेक ठिकाणी दिसत आहे. पावसामुळं मुंबई विद्यापीठांच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.






