बाप तो बाप… बेटी सुभान अल्ला… असं म्हणायची वेळ मुंब्रा वासियांवर आलीय… कारण एमआयएमची नवनिर्वाचित तरुण नगरसेविका सहर शेख… कैसा हराया अशा शब्दांत तिनं मुंब्र्याचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना अक्षरशः खिजवलंय.. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय… हम किसी के बाप के मोहताज नही है, असं ऐकवायलाही ती मागेपुढं पाहत नाही…मुंब्रा म्हणजे जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला. पण याच बालेकिल्ल्याला आता खिंडार पडलंय. एमआयएमचे चक्क ५ नगरसेवक मुंब्र्यातून निवडून आलेत. आव्हाडांसाठी आणखी धक्कादायक बाब म्हणजे कधीकाळी त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे खास समर्थक असलेले युनूस शेख आणि त्यांच्या मुलीनेच आव्हाडांचा टांगा पलटी करायला घेतलाय.
मुंब्र्याच्या प्रभाग 30 मध्ये पाय ठेवून तर दाखव
युनूस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मागितलं होतं. मात्र आव्हाडांनी सहर शेखला उमेदवारी द्यायला नकार दिला. तेव्हा शेख यांनी बंडाचं निशाण फडकावून एमआयएमची वाट धरली. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधून सहर युनूस शेख, नफिस अन्सारी, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीद हे चारही उमेदवार विजयी झाले. आता MIM च्या विजयानंतर आव्हाडांची वाट लावायची भाषा युनूस शेख करू लागलेत. मुंब्र्याच्या प्रभाग 30 मध्ये पाय ठेवून तर दाखव… असं खुलं चॅलेंज युनूस शेख यांनी आता आव्हाडांना दिलंय. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो… अगदी तसंच राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र देखील नसतो… हेच आव्हाड विरुद्ध शेख वादामुळं समोर आलंय.
मुंब्र्यातील राजकारण आणखी किती टोकाला जाणार?
एवढ्यावरच ही बाप-लेकीची जोडगोळी थांबली नाही… तर मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करून टाकू… मुंब्र्यातून विरोधकांना पळवून लावू, अशी जहरी भाषा ते वापरतायत…. या सगळ्या राजकीय वादावर आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आता काय पलटवार करणार? आणि मुंब्र्यातील राजकारण आणखी किती टोकाला जाणार? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय…





