Municipal Corporation Election Results 2026 : मुंबईपाठोपाठ वसई विरार, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांतही महापौरपदाची चुरस वाढलीय. वसईत ऑपरेशन लोटस राबवण्याची भाजपची तयारी असल्याचं सांगण्यात येतंय. तर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्येही भाजप-शिंदे शिवसेनेत चुरस वाढली आहे.
मुंबईत महापौरपदावरुन हॉटेल पॉलिटिक्स रंगलेलं असताना महामुंबईतही काही महापालिकांत हीच स्थिती आहे. वसई विरार महापालिकेत 115 जागांपैकी बहुजन विकास आघाडीने ७१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं असलं तरी भाजपानं महापौरपद मिळवण्यासाठी आघाडी उघडली आहे. ऑपरेशन लोटस राबवून बविआचे नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपनं सुरू केल्याची माहिती आहे. बविआचे नेते भाजपाच्या संपर्कात असून त्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता. राजीव पाटील यांना हाताशी धरून ही खेळी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
वसई विरारमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस?
1. बहुजन विकास आघाडीमधील 16 नगरसेवकांना गट फोडण्याची रणनीती
2. भाजपकडे 43 तर शिवसेनेकडे 1 मिळून 44 नगरसेवक
3. बहुमतासाठी भाजपला 14 नगरसेवकांची गरज
4. 16 नगरसेवक फोडून ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न
राजकारणात काहीही होऊ शकतं असे सूचक विधान भाजपचे प्रवक्ते मनोज बारोट यांनी केलंय. तर बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी या चर्चेचा खरपूस समाचार घेत, भाजपाला इशारा दिला आहे. दुसरीकडे कल्याण–डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेत महापौरपदासाठी चुरस रंगलीय.
कल्याण डोंबिवलीत महापौर कुणाचा?
1. कल्याण डोंबिवलीत 122 जागांपैकी 104 जागा महायुतीला
2. शिंदेंच्या शिवसेनेचे 54, भाजपाने 50 नगरसेवक विजयी
3. महापौर पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा
4. इतर पक्षांतील नगरसेवकांना आपल्या गटात खेचण्यासाठी प्रयत्न
5. काही पक्षांचे विजयी नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना
6. अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला होण्याची शक्यता
तर उल्हासनगरमध्ये 78 पैकी 37 जागा मिळवत भाजपनं यश मिळवलंय. तर शिंदे शिवसेना आघाडीला 36 जागा मिळाल्यात. आता वंचित आणि अपक्ष असे 3 नगरसेवक शिंदे शिवसेनेसोबत जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महापौर पदावर सध्या भाजप आणि शिंदे शिवसेनेनं दावा केला असला तरी अपक्षांच्या साथीनं शिंदे शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता आहे. महापौर निवडीपर्यंत महामुंबईत सत्ताधाऱ्यांचा हा संघर्ष सगळीकडेच पाहावा लागेल असं दिसतंय.





