Nana Patole : जो शेतकरी अन्न पिकवतो, ज्या बळीराजाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते त्या शेतकऱ्याला एका कृषी अधिकाऱ्याने भर शेतात मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरला आहे. आता काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर निशाणा साधत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले नाना पटोले ??
नाना पटोले म्हणाले, ही घटना संपूर्ण शेतकरी वर्गाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला आहे. फडणवीसांचे सरकार शेतकरीविरोधी आहे, राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, दुसरे आमदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल देतो असे म्हणून अपमान करतात. नेते तर मग्रुरी करताच पण आता अधिकारीही मस्तवालपणा करु लागले आहेत. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा.
नेमकं काय आहे प्रकरण?? Nana Patole
मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा (MGNREGA) योजनेअंतर्गत फळबाग लागवड केली होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या कामाची मजुरी मिळालेली नव्हती. वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्याने पवार यांनी कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्याकडे याबाबत जाब विचारला. जिल्हा पातळीवर तक्रार दाखल झाल्याने तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर दबाव निर्माण झाला होता. Nana Patole
यानंतर सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी आले असता, पवार यांनी थकित अनुदानाबाबत पुन्हा विचारणा केली. यावेळी ऋषिकेश पवार हे मोबाईलद्वारे संपूर्ण पाहणी आणि संवादाचे चित्रीकरण करत होते. हे लक्षात येताच कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचा संताप अनावर झाला.
शिवीगाळ आणि मारहाण
“व्हिडीओ का काढतोस?” असा जाब विचारत त्यांनी थेट शेतकऱ्यावर हात उचलला. इतकेच नव्हे तर अंगावर धावून जात बूट उगारला, शिवीगाळ केली आणि जमिनीवरील मातीची ढेकळे उचलून शेतकऱ्यावर फेकली. हा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून संबंधित कृषी अधिकाऱ्याची दादागिरी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शेतकरी वर्गात तीव्र संतापाची भावना असून संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.






