Marathi News

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर : महामार्गासाठी ९० टक्के भूसंपादन अधिसूचित

Published:
सहा पदरी असलेल्या या ग्रीनफिल्ड महामार्गाची लांबी ३७४ किलोमीटर असेल. हा मार्ग नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतून जाणार असून, पुढे अक्कलकोटमार्गे आंध्रप्रदेशाशी जोडला जाणार आहे
नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर :  महामार्गासाठी ९० टक्के भूसंपादन अधिसूचित

नाशिक जिल्ह्यासाठी २०२६ वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक ठरत आहे. रिंगरोड प्रकल्प, त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण, स्टेशन दुरुस्ती यांसारख्या सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर आता नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी मंजूर झालेल्या या महामार्ग प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने नवी अधिसूचना काढत कामाला स्पष्ट गती दिली आहे.

९० टक्के भूसंपादनासाठी अधिसूचना

२९ जानेवारी रोजी झालेल्या लोकसभा बैठकीत नाशिक–अक्कलकोट महामार्गासंबंधी अद्यतन माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी तब्बल ९० टक्के भूसंपादनासाठी अधिसूचना जाहीर झाली असून, उर्वरित प्रक्रियाही जलदगतीने पूर्ण होत आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला चालना मिळणार असून, नाशिक शहर तसेच राज्यभरातील प्रवास सोयीसुविधांमध्ये मोठी उडी मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यात सध्या अनेक पायाभूत प्रकल्प वेगाने सुरू आहेत. व्दारका चौकातील भुयारी मार्ग, दहावा मैल उड्डाणपूल, सोग्रस–सटाणा घाटमार्गाचे रुंदीकरण, तसेच कोपरगाव–मालेगाव मार्गाची उन्नती यांसारखी महत्त्वाची कामे प्रगतिपथावर आहेत. या सर्वांच्या पुढे, ‘पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’अंतर्गत मंजूर झालेला नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग हा प्रदेशाच्या भविष्यातील विकासातील निर्णायक टप्पा मानला जात आहे.

कसा असेल महामार्ग

सहा पदरी असलेल्या या ग्रीनफिल्ड महामार्गाची लांबी ३७४ किलोमीटर असेल. हा मार्ग नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतून जाणार असून, पुढे अक्कलकोटमार्गे आंध्रप्रदेशाशी जोडला जाणार आहे. अंदाजे १९,१४२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमधील संपर्क मोठ्या प्रमाणावर सुधारेल.

महामार्गामुळे नाशिक–अक्कलकोट दरम्यानचा प्रवास चार तासांनी कमी होण्याचा अंदाज आहे, तर सुमारे ५१ किलोमीटर अंतराचीही बचत होईल. याशिवाय सुरत–चेन्नई दरम्यानची मालवाहतूक जवळपास १४ तासांनी कमी होऊ शकते. त्यामुळे उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठा फायदा होईल. गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशालाही हा महामार्ग जोडणार असल्याने हा देशाच्या मध्य-दक्षिण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

नाशिकजवळील आडगाव परिसरात हा महामार्ग मुंबई–आग्रा महामार्गाशी जोडला जाणार आहे. समृद्धी महामार्गाशीही या नवीन ग्रीनफिल्ड मार्गाची जोड मिळणार असल्याने राज्यातील महामार्ग जाळे अधिक मजबूत होणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि हा महामार्ग तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अधिसूचना जाहीर झाल्यामुळे प्रकल्पाची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यातील दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणारा हा ग्रीनफिल्ड महामार्ग आगामी काही वर्षांत प्रदेशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews