Marathi News

पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एसटीची नवी योजना; 75 स्थानकावर मोफत वाचनालय सुरू होणार

Written by:Rohit Shinde
Published:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक विभागामार्फत लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारा ” वाचन कट्टा ” हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एसटीची नवी योजना; 75 स्थानकावर मोफत वाचनालय सुरू होणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक विभागामार्फत लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारा ” वाचन कट्टा ” हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

७५ स्थानकांवर मोफत वाचनालयाची सुविधा

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर सर्वसामान्यांसाठी ‘मोफत वाचनालय’ सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर परिसरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी “मोफत वाचनालय” सुरू करणारं आहोत.

या वाचनालयात मराठी भाषेतील वि.स. खांडेकर , वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), कवी नारायण सुर्वे, पु.ल. देशपांडे, यांच्या सारख्या प्रथितयश व लोकप्रिय साहित्यिक, कवी यांची पुस्तके, कविता संग्रह, नामदेवराव ढसाळ, भालचंद्र नेमाडे,शंकर पाटील, व.पु. काळे, विश्वास पाटील, या सारख्या कादंबरीकार यांच्या कादंबऱ्या सर्वसामान्यांसाठी या वाचनालयात ठेवण्यात येतील.

वाचन संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न

ही पुस्तके संबंधित बसस्थानकावरील एसटी कर्मचाऱ्यांनाकडे नोंद करून लोक आपल्या घरी वाचनास घेऊन जाऊ शकतात व वाचन करून परत आणून देऊ शकतात. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मौलिक संदर्भ ग्रंथ देखील या फिरत्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील. अर्थात, ही सर्व सेवा मोफत असणार आहे.

तसेच स्थानिक वृत्तपत्रे देखील दररोजच्या दररोज उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे मराठी भाषेचा समृद्ध वारसा चालवणारा ” वाचन कट्टा ” बसस्थानकाच्या परिसरात निर्माण होईल असेही मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे एसटीने हा उपक्रम सुरू केल्यानंतर त्याला नेमका कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews