फलटणमधील ‘त्या’ डॉक्टर तरूणीचं CCTV फुटेज समोर; हॉटेलमधील शेवटच्या व्हिडीओमध्ये नेमकं काय दडलंय?

Written by:Rohit Shinde
Published:
साताऱ्यामधील फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आला आहे. कारण, हॉटेलमधील एंट्रीच संबंधित तरूणीचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे.
फलटणमधील ‘त्या’ डॉक्टर तरूणीचं CCTV फुटेज समोर; हॉटेलमधील शेवटच्या व्हिडीओमध्ये नेमकं काय दडलंय?

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने सध्या राज्यात नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे.

हॉटेलमधील CCTV फुटेज समोर

हॉटेल मालकाने स्वत: आज सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आपलं नाव लिहिताना दिसत आहे. नाव लिहिल्यानंतर तरुणी हॉटेलमधील रुमची चावी घेऊन जाते. याठिकाणी दरवाजा उघडताना डॉक्टर तरुणीला काहीतरी प्रॉब्लेम येतो. खोलीचा दरवाजा उघडण्याचा दोन-तीनवेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर दरवाजा उघडतो आणि तरुणी खोलीत प्रवेश करते. यानंतरच मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या करते. या सीसीटीव्ही फुटेजमुळे या आत्महत्या प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढली आहे.

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला डॉक्टर दिसत असून ती एकटीच आहे. ती हॉटेलमधील रुम क्रमांक ११४ मध्ये एकटीच गेली असल्याचेही दिसून आले आहे. रात्रीच्या सुमारास एकटीच या हॉटेलमध्ये कशी आली, नेमकं काय घडलं, या सगळ्याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून आता या फुटेजच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.

हॉटेल मालक दिलीप भोसलेंचे दावे

मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. “या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला पोलिसांना ज्यावेळेस पोलिसांना बोलावले त्यावेळी पोलिसांनी यायला उशीर होत असल्यामुळे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडली. त्यानंतर पोलिसांना पाचरण केले असता पोलीस लगेच आले. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी गेली 30-35 वर्ष झाले सामाजिक कार्यात काम करतोय. चांगले निर्णय घेतले, त्याच्यामुळे काही लोक मला बदनाम करतात.”

“आम्ही 23 ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीला खोली दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता तिने कॉल केला होता, तोपर्यंत ती व्यवस्थित होती. रात्री हॉटेलमध्ये चेक इन करताना तिने सांगितले होते की, मला सकाळी साडेनऊ वाजता बारामतीला जायचे आहे. परंतु दुसऱ्या दिवशी दुपारी संशय आला. त्यावेळेस आम्ही वकिलांच्या सल्ल्यानुसार दरवाजा उघडला, त्यावेळेस तिने फास घेतलेला पाहायला मिळाले.” हॉटेल मालकांनी प्रकरणावर हे सष्टीकरण दिले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews