Marathi News

शनी-शिंगणापूर देवस्थानच्या एका अधिकाऱ्याने जीवन संपवले; भ्रष्टाचार चौकशी सुरू असल्याने आत्महत्या केल्याची माहिती

Written by:Rohit Shinde
Published:
भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु असताना नितीन शेटे यांच्या आत्महत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शनी-शिंगणापूर भ्रष्टाचार प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे.
शनी-शिंगणापूर देवस्थानच्या एका अधिकाऱ्याने जीवन संपवले; भ्रष्टाचार चौकशी सुरू असल्याने आत्महत्या केल्याची माहिती

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरी छताला गळफास घेऊन त्यांनी आयुष्याची अखेर केली. नितीन शेटे हे माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शनी शिंगणापूर देवस्थानमधील सुरू असलेल्या भ्रष्टाचार चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

नितीन शेटेंनी आत्महत्या का केली?

शनिशिंगणापूर येथील शनी मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेटेंच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नितीन शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे जवळचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सोनई येथे शव विच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थान विविध वादामुळे चर्चेत आहे. धर्मादाय आयुक्तांकडेही या प्रकरणी सुनावणीही सुरु आहे.

बोगस अॅप; आणि कोट्यवधींचा घोटाळा

आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी नकली ॲप तयार करून भाविकांकडून पूजेसाठी त्यावर पैसे घेतले जात असल्याचा प्रकारही सभागृहात उपस्थित केला होता. धस यांनी आरोप केला की या अ‍ॅपच्या माध्यमातून किमान 500 कोटींची रक्कम गोळा करण्यात आली आहे.

ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या, कागदोपत्री दाखवलेल्या एकूण 2474 कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे मस्टर सापडले नाही, त्यांचा हजेरीपटही नव्हता आणि कोणाची सही देखील नव्हती.  घोटाळेबाजांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाच बँक खाती उघडायला लावली होती. मंदिराच्या खात्यातून अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळत होता. पगाराची रक्कम प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या खात्यात जात होती.

देवस्थान आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होते. मात्र घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखवले. हे सर्व कर्मचारी बोगस होते. देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते. प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता. 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना, प्रत्यक्षात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते. अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले होते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews