भाडेवाढीसाठी ओला, उबर चालकांचा संप; प्रवाशांना मोठा मनस्ताप

Written by:Rohit Shinde
Published:
भाडे सुसूत्रीकरण अथवा भाडेवाढ आणि इतर प्रमुख मागण्यांवरून मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी मंगळवारी 15 जुलैला संप सुरू केला आणि बुधवारी निषेधाचा दुसरा दिवस होता.
भाडेवाढीसाठी ओला, उबर चालकांचा संप; प्रवाशांना मोठा मनस्ताप

भाडे सुसूत्रीकरण अथवा भाडेवाढ आणि इतर प्रमुख मागण्यांवरून मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी मंगळवारी 15 जुलैला संप सुरू केला आणि बुधवारी निषेधाचा दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातील हजारो चालक या निषेधासाठी आझाद मैदानात जमले. तसेच, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी अ‍ॅप-आधारित वाहतुकीचा अभाव असण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना “पर्यायी व्यवस्था” शोधण्याचा सल्ला देण्यात आला. सद्यस्थितीला मुंबईतील प्रवाशांना काहीसा मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

ओला, उबरच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय

या संपाचा आता परिणाम मुंबईत दिसू लागला आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होताना दिसत आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतत आहे.  यामध्ये बाईक टॅक्सीवर पूर्णपणे बंदी आणावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासोबत ठराविक भाडे ठरवावे, मीटर टॅक्सीप्रमाणे ओला उबेरला देखील भाडं मिळावं, कॅब आणि टॅक्सी चालक बोर्ड कार्यक्षम करावं या मागण्या आहेत. त्यासाठी आझाद मैदानात ओला उबर टॅक्सी चालक आंदोलनासाठी बसले आहेत.

संपावर असलेल्या ओला उबेर चालकांकडून, जे या संपात सहभागी झाले नाहीत अशा टॅक्सींची अडवणूक केली जात आहे. अशा अनेक घटना समोर येत आहेत. ट्वीटरवर याबाबत अनेक प्रवाशांनीही तक्रारी केल्या आहेत. ओला उबर गाडी रस्त्यावर दिसताच त्या अडवल्या जात आहेत. शिवाय प्रवाशांनाही खाली उतरवण्यात येत आहे. या संपाच फटका मात्र आता मुंबईकरांना बसताना दिसत आहे.

चालकांच्या संपात फूट पडण्याची शक्यता

मुंब्य्रातील चालक ही या संपमध्ये सहभाग आहे. बुधवारी दुपारी मुंब्रा येथील वाय जंक्शन या ठिकाणी संपकरी निदर्शना करत होती. दरम्यान, त्याच वेळी अमीर नावाचा कॅब चालकाने पिस्तुल दाखवत  संपकऱ्यांना चालकांना दमदाटी केली. त्यामुळे संपात फूट पडते की काय अशी चिन्हे निर्माण झाली होती. शिवाय काही चालक संपात सहभागी न होता आपली सेवा सुरू ठेवताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत संपात फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ओला, उबर चालकांच्या मागण्या काय?

रॅपिडोने आकारलेले मनमानी दर बंद करावेत. त्या ऐवजी सरकारी मीटर दर करावेत अशी मागणी या चालकांची आहे. शिवाय बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात मुंबई असू नये अशी त्यांची मागणी आहे.  रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणली जावी. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जावे. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करण्याचीही मागणी या संपाच्या माध्यमातून केली जात आहे.