Marathi News

पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकारण्याची मोठी संधी; म्हाडाकडून 4,186 घरांसाठी लॉटरी, तात्काळ अर्ज भरा!

Written by:Rohit Shinde
Published:
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने तब्बल 4,186 घरांसाठी भव्य सोडतीची घोषणा केली आहे. 
पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकारण्याची मोठी संधी; म्हाडाकडून 4,186 घरांसाठी लॉटरी, तात्काळ अर्ज भरा!
पुण्यात घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. या शहराची संस्कृती, शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकजण येथे स्थायिक होण्याची इच्छा बाळगतात. स्वतःचे घर म्हणजे सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक. घर घेतल्याने कुटुंबासाठी एक कायमस्वरूपी ठिकाण निर्माण होते. पुण्यातील वाढती घरांची मागणी लक्षात घेता सरकार देखील विशेष प्रयत्न करताना दिसते. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने तब्बल 4,186 घरांसाठी भव्य सोडतीची घोषणा केली आहे. 

पुण्यात 4,186 घरांसाठी म्हाडाची सोडत

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने तब्बल 4,186 घरांसाठी भव्य सोडतीची घोषणा केली आहे. त्यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि महागाईमुळे अनेकांसाठी घर खरेदी करणे कठीण झाले असले तरी या सोडतीमुळे स्वप्नवत घर मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या सोडतीत विविध योजनांमधून घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 219 घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेत 1,683 घरे, 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 864 घरे तर 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत 3,322 घरे देण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीय कुटुंबांपर्यंत सर्वांना आपल्या बजेटनुसार घर घेण्याची संधी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि अखेरची सोडत

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून अर्ज व अनामत रक्कम भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 अशी आहे. बँक RTGS/NEFT द्वारे रक्कम भरण्याची शेवटची संधी 1 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबरला प्राथमिक यादी जाहीर होईल, 13 नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येतील, तर 17 नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. अखेरची सोडत 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता पार पडणार असून निकाल त्याच दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर जाहीर केला जाईल.

पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. अर्ज नोंदणीपासून रक्कम भरणे आणि निकाल तपासणे, हे सर्व टप्पे अर्जदारांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी वेळेवर अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे इच्छुकांनी खरंतर तात्काळ या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews