श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरात हजारो भाविकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. 25 जुलैपासून ते 23 ऑगस्टपर्यंत श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

पोलिसांच्या भाविकांना नेमक्या काय सूचना?

पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार, भाविकांनी त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येताना मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड इत्यादी सोबत आणू नयेत. तसेच शक्यतो कमीत कमी सामान घेऊन यावे. गर्दीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींशी जास्त संवाद न साधणे आणि आपल्या वस्तूंची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना मोठ्या बॅगा, पिशव्या घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हे पाऊल सुरक्षेच्या दृष्टीने उचलण्यात आले आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तूंमुळे गोंधळ किंवा असुरक्षित वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते.

त्यामुळे मंदिर परिसरात आणि गर्दीच्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.तसेच भाविकांना जर कुठेही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या, तर त्यास हात लावू नये आणि तात्काळ पोलिसांना कळवावे. सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.गर्दी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निगराणी, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.

भाविकांची दर्शनासाठी रिघ; महात्म्य काय?

श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होते, पापमुक्ती मिळते, आरोग्य आणि सौख्य प्राप्त होते, तसेच आयुष्यातील अडथळे दूर होतात, असे भक्तांचे प्रगाढ श्रद्धास्थान आहे.त्र्यंबकेश्वर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, येथे भगवान शंकराची त्रिमूर्ती  ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे दर्शन एका शिवलिंगात होते. हे स्थान गौतमी गंगा नदीच्या उगमाजवळ स्थित असून, अत्यंत शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण सोमवारी येथे हजारो भाविक पायी यात्रा करून दर्शन घेतात. श्रद्धेने या दिवशी उपवास, रुद्राभिषेक, अभिषेक पूजा, बिल्वपत्र अर्पण, आणि महादेवाचे मंत्र जपले जातात.