महादेवी किंवा माधुरी हत्तीणीची चर्चा काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे नांदणी गावातील जनता, राजकारणी महादेवीला नांदणीला परत आणण्यासाठी पेटून उठले आहेत. अशात वनताराने देखील सहकार्याची भूमिका दाखवलेली असताना आता पेटा संघटनेकडून मात्र महादेवीला कोल्हापुरात परत पाठविण्यास तीव्र विरोध केल्याची माहिती समोर येत आहे. नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी’ हत्तीणीच्या (माधुरी) पुनर्वसनाच्या हालचालींमध्ये प्राणी संरक्षण संस्था पेटा इंडियाने नव्या पत्रातून आणखी एक अडथळा उभा केला आहे.

पेटा संघटनेचे निवेदन नेमके काय?

महादेवीच्या हस्तांतरणास विरोध करताना पेटा संघटना म्हणते की, “महाराष्ट्रात वन्य हत्तींच्या उपचार व पुनर्वसनासाठी आवश्यक दर्जाच्या सुविधा नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी महादेवीला पुन्हा नांदणीत नेऊन साखळदंडात ठेवणं अमानवीय ठरेल,” असा ठाम दावा केला. त्यामुळे आधीच गुंतागुंतीचे झालेले हे प्रकरण पुन्हा विलंबित होण्याची शक्यता वाढली आहे. पेटा संघटनेच्या या दाव्यामुळे आता महादेवी हत्तीणीचा कोल्हापूरला परतण्याचा मार्ग अधिक खडतर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हत्तीणीचे नेमके होणार काय, ती वनतारामध्येच राहणार का? असे सवाल आता या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

महादेवी वनतारात सुरक्षित -पेटा

पेटाच्या मते, महाराष्ट्रात योग्य सुविधा नसल्याने महादेवीला वनतारा (गुजरात) येथेच ठेवणं हितावह ठरेल. तसेच उत्तर प्रदेशातील ‘Wildlife SOS’ किंवा कर्नाटकमधील ‘Wildlife Rescue and Rehabilitation Centre’ येथे तिला सुरक्षित व आरोग्यपूर्ण निवृत्ती मिळू शकते, तर त्या ठिकाणी पाठवण्यासही ते तयार आहेत. “महादेवीला शांत, सुरक्षित आणि तिच्या शारीरिक-मानसिक पुनर्वसनासाठी अनुकूल जागा मिळवून देणं हा आमचा एकमेव हेतू आहे,” असं पेटाने स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयानेही हे सुनिश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं असून, प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्यास योग्य निर्णय होईल, असा त्यांचा विश्वास आहे.