पंढरपूरात येणाऱ्या भाविकांची श्रद्धा ही अतूट व गाढ असते. लाखो वारीकरी विठोबा-माऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने पायी वारी करतात. विठ्ठलाच्या नामस्मरणात रमलेले हे भाविक भक्ती, सेवा आणि त्यागाचे प्रतीक आहेत. त्यांची श्रद्धा प्रत्येक वर्षी वाढतच जाते आणि पंढरपूरचे माहात्म्य अधोरेखित करते. अशा परिस्थितीत आता याच पंढरपुरात भाविकांच्या श्रद्धेशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चंद्रभागेच्या पाण्याची भाविकांना विक्री!
आषाढी एकादशीच्या यात्रेनंतर पंढरपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रभागा नदीचं पाणी, जे श्रद्धेनं तीर्थ म्हणून घेतलं जातं, तेच आता थेट विक्रीसाठी वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. बीव्हीजी या खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनीच हा गोरखधंदा केल्याचा आरोप आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये भाविकांकडून पैसे घेऊन नदीचं पाणी देताना संबंधित कर्मचारी दिसत आहेत. या काळात चंद्रभागा नदीला पूराचा इशारा असल्यामुळे महाद्वार घाटावरून थेट नदीत उतरण्यास बंदी होती. भाविकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि बीव्हीजी कंपनीचे सुरक्षारक्षक तैनात होते.
हे ही वाचा
भाविकांच्या श्रध्देशी खेळ सुरू
मात्र, याच सुरक्षारक्षकांनी नदीचं पाणी पैसे घेऊन भाविकांना वितरित केल्याचं समोर आलं. भाविकांमध्ये या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली असून, मंदिर प्रशासनाची भूमिकाही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे आता प्रशासनाकडून या सुरक्षारक्षकांवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता या प्रकरणावर आवश्यक तो तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरी गमावावी लागू शकतो. भाविकांना अशा लोकांना बळी पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.