Marathi News

पीएमपीएलचे भाडे इतक्या रूपयांनी वाढले; पुणेकरांचा बस प्रवास महागणार

Written by:Rohit Shinde
Published:
पीएमपीएलच्या भाड्यात तब्बल दहा वर्षानंतर मोठी भाडेवाढ होत आहे, परिणामी पुणेकरांचा अंतर्गत बस प्रवास आता महागणार आहे, सविस्तर जाणून घ्या...
पीएमपीएलचे भाडे इतक्या रूपयांनी वाढले; पुणेकरांचा बस प्रवास महागणार

पीएमपीएल बस सेवा पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. अशा परिस्थितीत आता पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन भा़डेवाढ 1 जूनपासून लागू केली जाणार असल्याची माहिती आहे. दैनंदिन पासचे दरही वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता कित्येक वर्षानंतर का होईना पण पुणेकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे.दहा वर्षानंतर पीएमपीएमएलच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

नवे दर कसे असणार?

05 किमी अंतरासाठी  10 रुपये

5.1 किमी ते 10 किमी 20 रुपये

10.1 ते 15 किमी       30 रुपये

15.1 ते 20 किमी        40 रुपये

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बससेवा पुरवण्यात येते. या सेवेच्या प्रवास भाड्यात 1 जून 2025 पासून सुधारित स्टेज रचनेनुसार बदल करण्यात येत आहे. नव्या दरांची अंमलबजावणी पहाटेपासूनच सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 31 मार्च 2018 रोजीच्या राजपत्रानुसार, तसेच इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या धर्तीवर पीएमपीएमएलने प्रवासात सुसूत्रता येण्यासाठी स्टेज रचनेत बदल केला आहे.

बस प्रवासासोबत दैनंदिन आणि मासिक पासचे दरही वाढवण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदिन पाससाठी पूर्वी 40 रुपये लागत होते. आता त्याला 70 रुपये लागणार आहे. पीएमआरडीए हद्दीत पाससाठी आता 120 रुपयांऐवजी 150 रुपये लागणार आहेत. तसेच मासिक पास 900 रुपयांऐवजी 1,500 रुपये लागतील. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतीत बदल केला नाही.

पुणेकरांसाठी पीएमपीएलचे महत्व

पुणेकरांसाठी पीएमपीएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) हे एक अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक वाहतूक साधन आहे. पीएमपीएलद्वारे हजारो नागरिक रोज ऑफिस, शाळा, कॉलेज आणि बाजारपेठांमध्ये जातात. ही सेवा स्वस्त, पर्यावरणपूरक आणि वेळेत पोहोचणारी असल्यामुळे अनेकांना खासगी वाहनांची गरज भासत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होते. पुण्यासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात पीएमपीएलची भूमिका केंद्रस्थानी आहे. कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी ही एक मोठी सोय आहे. पीएमपीएलच्या विकासामुळे शहराचा सर्वांगीण विकास शक्य होतो. शहरे सक्षम बनवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी पीएमपीएल आवश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews