काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज 18 डिसेंबर काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला असून, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.
प्रज्ञा सातवांकडून आमदारकीचा राजीनामा
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राज्यातील राजकाणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी आज 18 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी त्यांच्या कॉंग्रेस विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला आहे.
दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाबाबत तथ्य नसल्याचे म्हटले असले, तरी प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
सातव परीवार आणि काँग्रेस घनिष्ठ संबंध
प्रज्ञा सातव सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत आणि विधान परिषदेच्या आमदार आहेत. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेवर त्या २०२१ मध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आल्या असून त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. २०१४ मध्ये देशभरात मोदी लाटेत काँग्रेस भुईसपाट झाली होती. महाराष्ट्रातही काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे इतके घनिष्ठ संबंध असताना सातव काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे. तरी भाजपकडून अखेर या संबंधांना सुरूंग लावल्याचे स्पष्ट झाले आहे.





