Marathi News

पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रांची मंजूरी, 13 नवी स्थानके आणि 3,626 कोटींचा खर्च अपेक्षित

Written by:Rohit Shinde
Published:
केंद्रीय मंत्रीमंडळाने पुण्याच्या मेट्रो रेल प्रकल्प फेज -2 ला मंजूरी दिली आहे. कॉरीडॉरची एकूण लांबी 12.75 किमीचा असून त्यात 13 स्थानकांचा समावेश आहे.
पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रांची मंजूरी, 13 नवी स्थानके आणि 3,626 कोटींचा खर्च अपेक्षित

केंद्रीय मंत्रीमंडळाने पुण्याच्या मेट्रो रेल प्रकल्प फेज -2 ला मंजूरी दिली आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी या सध्याच्या वनाज – रामवाडी कॉरीडॉर फेज-1 चा विस्तार आहे. या दोन एलिवेटेड कॉरीडॉरची एकूण लांबी 12.75 किमीचा असून त्यात 13 स्थानकांचा समावेश आहे. या मेट्रो मार्गामुळे पुण्यातील चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली उपनगरातील कनेक्टीव्हीटी वाढणार आहे. या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याची योजना आहे.

13 नवी स्थानके होणार

संपूर्ण प्रकल्पाची किंमत 3626.24 कोटी रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाच्या खर्चाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाची अर्धा खर्च आता राज्य सरकार देणार आहे. मेट्रो मार्गिकांच्या या विस्तारामुळे प्रमुख आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांना कनेक्टीव्हीटी मिळणार आहे.त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे.मेट्रो नेटवर्कमधील प्रवाशांची संख्या वाढेल. नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन-1(निगडी-कात्रज) आणि लाईन-3 (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) सोबत देखील एकत्रित केले जातील जेणेकरून अखंड मल्टीमॉडल शहरी प्रवास शक्य होईल.

पुणेकरांचा प्रवास जलद होणार

दीर्घकालीन वाहतूक नियोजनाअंतर्गत, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांमधून पुणे शहरात येणाऱ्या इंटरसिटी बस सेवा चांदणी चौकात एकत्रित होतील तर अहिल्या नगर आणि छत्रपती संभाजी नगर येथून येणाऱ्या बस सेवा वाघोली येथे एकत्र जोडल्या जातील. ज्यामुळे प्रवाशांना पुण्याच्या मेट्रो सिस्टीममध्ये सहज प्रवेश मिळेल. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोडसारख्या प्रमुख मार्गांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध होतील.

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews