दररोज हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी सुखद बातमी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची पहिली चाचणी यशस्वीरीत्या जुलै महिन्यात पार पडली होती. नुकतीच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुणेरी मेट्रो प्रथमच हिंजवडीपासून बाहेर निघाली. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची माण डेपो ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत दुसरी चाचणी बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी यशस्वी झाली. या मेट्रो मार्गाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे अंतिम लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला जमीन भूसंपादनातील अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे काम उशीराने सुरू झाले होते. तब्बल 23.3 किमी लांबीच्या या मार्गामुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची अपेक्षा आहे.

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचे सध्या 87 टक्के काम पूर्ण झाले असून माण डेपो ते PMR-4 स्टेशन दरम्यान पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. या मार्गावर एकूण 23 मेट्रो स्थानके असतील, ज्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामासाठी जाणाऱ्या नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल. सध्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये एक लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. हा प्रकल्प भारतातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारीत (PPP) उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प आहे. टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त उपक्रमातून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या नावाने हा प्रकल्प राबविला जात आहे. काम 25 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू झाले होते. आतापर्यंत चार मेट्रो गाड्या उपलब्ध झाल्या असून प्रत्येक गाडीत सुमारे 1,000 प्रवासी प्रवास करू शकतील. गाड्या 80 किमी प्रतितास वेगाने धावणार आहेत.

वाहतूक व्यवस्थेत मेट्रोमुळे मोठे बदल घडणार

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग पूर्ण होणे वाहतूक समस्यांवर उपाय ठरणार आहे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फक्त मेट्रो सुरू करणे पुरेसे नाही. प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी ई-रिक्शा, फीडर बस आणि रिक्षा यांसारख्या लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी आणि खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागेल, ज्यामुळे शहरातील कोंडी आणि प्रदूषणावर फारसा फरक पडणार नाही. सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा देण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे.