Marathi News

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण; प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन मिळण्याची शक्यता

Written by:Rohit Shinde
Published:
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण; प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन मिळण्याची शक्यता

पुणे रेव्ह पार्टीचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता यानिमित्ताने प्रांजल खेवलकरांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रांजल खेवलकरांना जामीन मिळण्याची शक्यता

आधी दोन महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता उर्वरित पाच आरोपींनाही न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आल्याने या सर्वांना जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

पुणे रेव्ह पार्टी; तेव्हा नेमकं काय घडलं?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली.पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे .श्रीपाद यादववर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झाली आहे. तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो. या दोघांच्या संपर्कात आल्यानेच प्रांजल यांच्या अडचणी वाढल्या.

या दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले. शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले. यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरुन दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समधे अंमली पदार्थ सापडले. अंमली पदार्थ सापडल्यानेच या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले, आणि राजकीय रंग देखील या प्रकरणाला आला.

खेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न?

दरम्यान सातही आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी विजयसिंह ठोंबरे यांनी प्रांजल खेवलकरांची बाजू मांडली. प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलेलं नाही. मेडीकल रिपोर्ट येतील तेव्हा लक्षात येईल कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलंलं नव्हतं. प्रांजल खेवलकर राहत असलेल्या हॉटेलची रेकी करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रांजल खेवलकरांना अडकविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा वकीलांकडून केला जात आहे. आता यामध्ये नेमके काय सत्य समोर येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी ट्वीस्ट येण्याची शक्यचा निर्माण झालेली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews