Marathi News

पुणे–कोकण–गोवा प्रवासाला नवे पंख : अवघ्या एका तासात समुद्रकिनाऱ्यांची सफर

Published:
पुण्यातील प्रवाशांसाठी आणि पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण आणि गोवा या दोन्ही लोकप्रिय पर्यटनस्थळांसाठी आता अत्यंत वेगवान आणि सोयीस्कर हवाई सेवा उपलब्ध झाली आहे
पुणे–कोकण–गोवा प्रवासाला नवे पंख : अवघ्या एका तासात समुद्रकिनाऱ्यांची सफर

पुण्यातील प्रवाशांसाठी आणि पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण आणि गोवा या दोन्ही लोकप्रिय पर्यटनस्थळांसाठी आता अत्यंत वेगवान आणि सोयीस्कर हवाई सेवा उपलब्ध झाली आहे. Fly91 या प्रादेशिक विमान कंपनीने पुणे–सिंधुदुर्ग आणि पुणे–गोवा दरम्यान नवीन विमानसेवा सुरू केल्याने हा प्रवास आता केवळ ६० मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे.

तिकीट किती

पुणे ते सिंधुदुर्ग हे साधारण ८ ते ९ तासांचे रस्ते अंतर असून, या मार्गावरील लांबचा घाट, ट्रॅफिक आणि प्रवासाचा ताण यामुळे अनेकजण हा प्रवास टाळत असत. मात्र, सुरू झालेल्या या नवीन उड्डाण सेवेमुळे हा प्रवास तासाभरात पूर्ण होणार असून, पर्यटकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. सोशल मीडियावर एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार या फ्लाइटचे एकमार्गी तिकीट अवघ्या २,३०० रुपयांपासून सुरू होत असल्याने हा प्रवास आर्थिकदृष्ट्याही परवडणारा ठरत आहे.

सध्या ही विमानसेवा शनिवार आणि रविवारी उपलब्ध असेल. विकेंडला पर्यटनासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

कसे आहे वेळापत्रक 

या मार्गासाठी दोन फ्लाइट्स उपलब्ध आहेत.
पुणे ते सिंधुदुर्ग (IC 5302) सकाळी ८:०५ वाजता उड्डाण घेते आणि ९:१० वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचते. परतीचे उड्डाण (IC 5303) सिंधुदुर्गहून सकाळी ९:३० वाजता सुटते आणि १०:३५ वाजता पुण्यात लँडिंग होते. गोवा ते पुणे (IC 1376) हे उड्डाण सकाळी ६:३५ वाजता सुटून ७:४० वाजता पुण्यात पोहोचते. तर पुणे ते गोवा (IC 1375) हे विमान सकाळी १०:५५ वाजता उड्डाण घेते आणि १२:१० वाजता गोव्यात पोहोचते.

या सेवेमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे तसेच गोव्याचे प्रसिद्ध बीच आणि पर्यटनस्थळे यांना भेट देण्यासाठी आता वेळ आणि प्रवासाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विकेंडला त्वरित ट्रिप प्लॅन करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

प्रादेशिक संपर्क वाढवणे आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असून, नवीन विमानसेवा त्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews