मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, आणि त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनेनं आज आंदोलन केलं. हे आंदोलन आता मागे घेतलं असलं तरी त्याचा परिणाम संध्याकाळपासूनच दिसायला लागला. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत, अशा परिस्थितीत लोकल सेवा विस्कळीत झाल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. लोकल गाड्यांमध्ये गर्दी असल्याने मस्जिद स्थानकानजीक एक दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तीन प्रवाशांनी जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे.
गर्दीमुळे लोकलच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू
मुंब्रा रेल्वे प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसला असून 20 मिनिटांपासून ट्रेन दादरला थांबून आहेत. त्यामुळे, मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रॅकवरुन जात असताना लोकलची धडक बसल्याने खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मस्जिद आणि सीएसएमटी रेल्वे मार्गावर सँडहर्स्ट रोडजवळ हा अपघात झाला. ट्रॅकवरुन प्रवासी चालत होते, 3 पुरुष आणि 1 महिला ट्रॅकवरुन चालत असताना अचानक लोकल मागून आली, त्यात त्यांना धडक बसली. अंबरनाथला जाणारी लोकल ट्रेन होती, अशी माहिती आहे.
हे ही वाचा
रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन नेमके का ?
जून 2025 मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेतून पडून झालेल्या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले होते. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्यांवर निष्काळजीपणा आणि ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. जलद लोकलच्या दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सीएसएमटी प्रमाणेच मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवरही गुरुवारी आंदोलन झाले. ठाणे स्थानकावर 3 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी लोकल रेल्वे रोखून धरली. एकूणच मुंबईतील लोकल रेल्वेचे वेळापत्रक सध्या विस्कळीत झालेले आहे.