राज्यातील काही भागांत हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काहींना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार सरी बरसत असताना, इतर ठिकाणी हलक्यापासून मध्यम पावसाची संततधार कायम आहे. मात्र, 27 जुलै नंतर पावसाचा तीव्रता काहीशी घटण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने पावसाबाबत नेमका काय अंदाज वर्तवला आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत काही निवडक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे व सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, याठिकाणी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या घाटप्रदेशातही मुसळधार सरींची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात पाऊस कसा राहणार?

विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यांसह आणि विजांच्या गडगडाटासोबत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वाऱ्याच्या झपाट्यासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत केवळ हलक्याच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकच्या घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकंदरीत आगामी काही दिवसांत राज्यातील पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.