Rain Updates: मुंबई, ठाण्यात अचानक कोसळधारा; दिवाळीच्या खरेदीमध्ये पावसाचा व्यत्यय

Written by:Rohit Shinde
Published:
नागरिक दिवाळीच्या खरेदीमध्ये व्यस्त असताना मुंबई-ठाण्याच्या काही भागात अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे ऐन दिवाळीत पावसाचा व्यत्यय पाहायला मिळतोय...
Rain Updates: मुंबई, ठाण्यात अचानक कोसळधारा; दिवाळीच्या खरेदीमध्ये पावसाचा व्यत्यय

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरे आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये अचानक पाऊस कोसळला. आज संध्याकाळनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. असा अचानक पाऊस पडेल अशी कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

अचानक पडलेल्या पावसामुळे व्यत्यय

ठाणे, नवी मुंबई इथे आज नेहमीप्रमाणे कडक ऊन पडलं होतं. त्यामुळे उकाड्याने नागरीक हैराण झालं होतं. या भागातील नागरीक सध्या ऑक्टोबर हिटचा सामना करत असताना बघायला मिळत होतं. कारण सकाळी दहा वाजेपासून तीव्र ऊन पडताना दिसत होते. यामुळे आता हिवाळा कधी सुरु होईल, याची वाट नागरीक पाहत होते. प्रत्येक जण वेगवेगळी खरेदी करत आहे. घराघरात उत्साहाचं वातावरण आहे. पण या उत्साहावर परतीच्या पावसाने विरजण पाडलं आहे. कारण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. तसेच व्यापाऱ्यांचंदेखील नुकसान झालं आहे.

फक्त बाजारपेठाच नाही तर ऑफिसची कामे पूर्ण करुन घरी निघालेल्या नागरिकांनादेखील पावसामुळे फटका बसलेला बघायला मिळाला. अनेक जण पावसाळा संपला या अविर्भावात असल्याने रेनकोट, छत्री सोबत घेणं टाळत होते. पण त्यांना आज अचानक आलेल्या पावसाने फटका बसला. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील पावसाचा फटका बसला. तसेच कल्याण डोंबिवली, ठाणे शहर, बदलापूर, अंबरनाथ, नवी मुंबई येथे प्रचंड पाऊस पडला.

अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे आणि सातारासह 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी स्पेशल पॅकेज देखील जारी करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.