राज्याच्या जवळपास सर्वच भागात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. नागपुरात पावसाची संततधार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाने गंभीर पूरस्थिती निर्माण केली आहे. नागनदी, पोहरानदी, पिवळी नदीला पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नागपूर शहरासह जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
या पावसाच्या काळात 50 हून अधिक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरलं असून शहरातील 23 प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने नदीचं स्वरुप आले आहे. पुरात अडकलेल्या 47 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून या मुसळधार पावसामुळे 11 जनावरं मृत झाल्याची माहिती मिळत असून 453 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. सध्या संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. गेल्या 24 तासात नागपूरात 95.6 मिलिमीटर आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
विदर्भात 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
आज विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज नागपूरसह भंडरा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उद्या शुक्रवारी देखील ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
विदर्भाला पावसानं झोडपून काढलं आहे, बुधवारी नागपूरमध्ये जोरदार पाऊ झाला. यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आजही नागपूरसह विदर्भातील 5 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, वर्धा, गडचिरोली या भागातील पावसाची संततधार आगामी काही दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






