पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. मध्यरात्री पाणी पातळीत वाढ झाली आणि काही भागांमध्ये पाणी शिरले. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आणि रस्ते जलमय झाली.सोसायट्यांमध्येही पाणी शिरले आहे. मुठा नदीला पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुणेकरांची यामुळे चिंता वाढली आहे. तरी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
खडकवासला धरणातून विसर्ग सुरू
खडकवासला धरणातील विसर्गात वाढ झालीये.नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. गेल्या वर्षीसारखी पूरपरिस्थिती उद्धभवू नये, यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. खडकवासला धारणातून मुठा नदी पात्रात 28 हजार 662 क्युसेक विसर्ग सुरु आहे. आगामी काही दिवसांत घाट परिसरातील पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुणेकरांसाठी हा मोठा चिंतेचा विषय ठरू शकतो.
राज्यातील पावसाचा जोर ओसरणार?
राज्यात सद्यस्थितीला कोकण आणि विदर्भाचा काही भाग, पुणे शहर वगळता उर्वरीत राज्यात सध्या पावसाचा जोर चांगलाच ओसरला आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने थोडा विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अपवाद वगळता, बहुतांश भागांत उन्हाचे दर्शन झाले. तर काही ठिकाणी हलकासा रिमझिम पाऊस अनुभवायला मिळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेले राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या उपनगरांसाठी पुढील 24 तासांसाठी कोणताही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कमी होईल. 29 जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये वगळता राज्यात पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. 30 जुलैपासून पुढील काही दिवस पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटभागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही निवडक भागांत हलक्या सरी वगळता बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा भागातूनही पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्यापासून मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.मराठवाड्यातील शेतकरी वर्गात मात्र सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.





