राज्यभरात आज पावसाची विश्रांती; काही जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता

Written by:Rohit Shinde
Last Updated:
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात कहर केला. त्यानंतर आता आज राज्यभरात पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यभरात आज पावसाची विश्रांती; काही जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता

सप्टेंबर महिन्यात राज्याच्या सर्वच भागात पावसाने कहर केला. मात्र आज 30 सप्टेंबर रोजी राज्यात सर्वदूर पाऊस मंदावला आहे. अनेक ठिकाणी सुर्यदर्शन होत असून निरभ्र आकाश पाहायला मिळत आहे. पावसाने चांगली उघडीप दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. शिवाय सरकारी पातळीवर अतिवृष्टीचे पंचनामे आणि नुकसान भरपाईच्या कामांना देखील आता वेग येणार आहे.

राज्यभरात पावसाची विश्रांती

काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर अनुभवून झाल्यानंतर आज, 30 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत पावसाला थोडासा ब्रेक मिळाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाने दोन दिवसांपासून ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना गेले काही दिवस जाणवलेला मुसळधार पावसाचा तडाखा आज कमी होणार आहे.

मुंबईसह कोकणाला दिलासा

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील भागांतही मुसळधार पावसाला आज थोडा ब्रेक मिळाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, मात्र जोरदार पाऊस नाही. तापमान 26°C ते 30°C दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग 12-15 किमी/तास असेल. दमट हवामानामुळे किनारी भागांत उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

मुंबईत सलग कोसळणारा पाऊस आज थांबलेला असून वातावरण तुलनेने शांत आहे. सकाळपासून आकाश ढगाळ आहे, पण पावसाची तीव्रता दिसत नाही. दिवसभरात हवा स्थिर राहण्याचा अंदाज आहे. आजचे कमाल तापमान अंदाजे 30°C आणि किमान तापमान 26°C नोंदवले जाईल. वाऱ्याचा वेग 12-15 किमी/तास इतका असेल. दमट हवामानामुळे उकाडा वाढेल. पालघर जिल्ह्यातही 3-4 दिवस सतत झालेला पाऊस आज आटोपलेला आहे. हवामान शांत असून आकाश ढगाळ आहे.
ठाणे व नवी मुंबईत कालपर्यंत जोरदार पाऊस झाला होता, मात्र आज विश्रांती मिळालेली दिसते. ढगाळ वातावरण कायम असले तरी हलकी रिमझिम शक्य आहे. तापमान 27°C ते 31°C दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग सुमारे 15 किमी/तास नोंदवला जाईल आणि आर्द्रतेमुळे उष्णता अधिक जाणवेल. त्यामुळे जनजीवन आता सुरळीत होण्याचे चित्र आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews