महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाला ब्रेक; विदर्भ-मराठवाड्यात उद्यापासून मुसळधार पावसाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यभरात आज पावसाची विश्रांती पाहायला मिळेल. उद्यापासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर चांगलाच वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाला ब्रेक; विदर्भ-मराठवाड्यात उद्यापासून मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे. राज्यात सध्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. आज 10 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप असणार आहे, मात्र उद्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि कोकणात या आठवड्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा चांगला जोर राहण्याची शक्यता आहे.

राज्यभरात आज पावसाला ब्रेक!

गेले काही दिवस मध्य भारतात सक्रिय असलेली कमी दाबाची प्रणाली पाकिस्तानच्या दिशेने सरकल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उसंत घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा अंदाज

आगामी काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार अशा पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे तेलंगणा, कर्नाटक सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये या काळात जोरदार अशा स्वरूपाचा कोसळेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली,कोल्हापूर या जिल्ह्यांत देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही भागात चांगल्या पावसाची गरज

दुसरीकडे मुंबई आणि कोकणपट्ट्यात पुढील काही दिवस पाऊस उसंत घेईल.मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी सकाळच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरलेली होती. पुढील काही दिवसात राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सततच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल. तरी देखील मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात अद्याप अधिकच्या पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे.