हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. 21 ते 26 जुलै हा चांगलाच पावसाचा काळ असेल असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात या काळात पावसाची स्थिती उत्तम राहील, असा अंदाज आहे. कोकणात पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
मुंबईसह उपनगरांत जोरदार पावसाचा अंदाज
मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून कामांवर जाणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झालीये.
यात पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रुज,वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास जर असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे सांगण्यात आले असून पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांत कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आज, 21 जुलै रोजी, या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तरीही काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वातावरण अधिक उष्ण आणि दमट बनले आहे. अनेक भागांत हलक्या रिमझिम सरी पडत असल्या तरी, उन्हाची तीव्रता आणि उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोकण किनारपट्टीवर मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आकाश ढगांनी व्यापलेले असून, पुन्हा एकदा जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. किनारी भागात दमट हवामान जाणवत असून, कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.





