राजीनामा तर द्यावाच लागेल! कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) कडून राज्यभर आंदोलन

Written by:Astha Sutar
Published:
मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय. अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
राजीनामा तर द्यावाच लागेल! कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) कडून राज्यभर आंदोलन

NCP Sharad Pawar party – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमासह समाज माध्यमांवरही सर्वांनी पाहिले आहेत. त्यामुळं सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. तर कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, समाज माध्यमांवर कोकाटेंचा व्हीडिओ समोर आल्यानंतर आज आमदार रोहित पवारांनीही २२ सेंकदाचा कोकाटेंचा व्हीडिओ शेअर केला आहे. तर दुसरीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) कडून राज्यभर आंदोलन करण्यात आले.

विझताना दिव्याची ज्योत मोठी होते…

दरम्यान, सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे.

राजीनाम्यासाठी अधिवेशनाची वाट कशाला पाहता…

मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी.

आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?

राज्यभर आंदोलन…

लोकशाहीच्या मंदिरात राज्याचे कृषी मंत्री ऑनलाइन जुगार खेळतात, ही गोष्ट मंत्रीपदाच्या गरिमेला मुळीच साजेशी नाही. अशा असंवेदनशील आणि जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे छत्रपती संभाजीनगर, धुळे तसेच राज्यातील अन्य भागात आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामान्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews