Marathi News

Samruddhi Mahamarg : मुंबई–नागपूर प्रवास आणखी सोपा! समृद्धी महामार्गावर 14 नवीन फूड प्लाझा उभारणार

Published:
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला असून पुढील तीन महिन्यांत २२ सुसज्ज फूड प्लाझा सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि तणावमुक्त होणार आहे
Samruddhi Mahamarg : मुंबई–नागपूर प्रवास आणखी सोपा! समृद्धी महामार्गावर 14 नवीन फूड प्लाझा उभारणार

Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट आता विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांसाठी प्रवासातील मोठा आधार ठरत आहे. या द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-नागपूरचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होऊ लागला असून, दीर्घ आणि थकवणारा प्रवास आता इतिहासजमा होत आहे. वेगवान प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळतोय, मात्र आतापर्यंत सोयीसुविधांचा अभाव ही मोठी तक्रार होती. खाण्यापिण्याची व्यवस्था, स्वच्छ शौचालये, पिण्याचे पाणी आणि इंधन भरण्याच्या सुविधांचा अभाव अनेकदा प्रवाशांची गैरसोय करत होता. पण आता या सर्व समस्यांवर तोडगा निघणार आहे.

काय आहे निर्णय (Samruddhi Mahamarg)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला असून पुढील तीन महिन्यांत २२ सुसज्ज फूड प्लाझा सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि तणावमुक्त होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित २२ पैकी ८ फूड प्लाझा आधीच कार्यान्वित झाले असून उर्वरित १४ फूड प्लाझा येत्या तीन महिन्यांत सुरू केले जाणार आहेत. सध्या वरगडी आणि मराळ येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी, तर मांडवा, वायफळ, मानकापूर आणि आमणे येथे एका बाजूने फूड प्लाझा उपलब्ध आहेत.

कोणकोणत्या ठिकाणी उभारणार फूड प्लाझा

आगामी टप्प्यात मानकापूर, मांडवा, वायफळ, आमणे, दवाळा, गणेशपूर, शिवनी, ताथोड, अखतवाडा, दव्हा, डोणगाव, पोखरी, अनंतपूर आणि कडवांची या ठिकाणी दोन्ही बाजूंनी अत्याधुनिक फूड प्लाझा उभारण्यात येणार आहेत. या सुविधांमुळे प्रवाशांना खाण्यापिण्याची चिंता उरणार नाही, तसेच स्वच्छ शौचालये, पिण्याचे पाणी आणि पेट्रोल-डिझेलची उपलब्धताही सुनिश्चित केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही काळात रस्ते विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. महामार्ग, उड्डाणपुल आणि द्रुतगती मार्गांच्या जाळ्यामुळे महाराष्ट्राचा पायाभूत विकास वेगाने पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाच्या विस्तारालाही आता अधिकृत ग्रीन सिग्नल मिळाला आहे. Samruddhi Mahamarg

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोंदिया तसेच भंडारा-गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित मार्गांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही प्रकल्प रखडू नये, कामांची गुणवत्ता आणि वेळेची काटेकोर अंमलबजावणी करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews