मिठी नदी सफाई घोटाळ्यात डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशी करा, संजय निरुपम यांची मागणी

Written by:Astha Sutar
Published:
भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरात ऑपरेशन सिंदूरची गौरव गाथा सांगत असताना राऊत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत का? ऑपरेशन सिंदूर फेल गेलं, असे वक्तव्य करणारे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलत आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली.
मिठी नदी सफाई घोटाळ्यात डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशी करा, संजय निरुपम यांची मागणी

Sanjay Nirupam – मुंबईची तुंबई झाली यावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच यावरून बरेच राजकारण होताना पाहायला मिळत आहे. मुंबईत नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली जात आहे. मात्र डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असून, या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मिठी नदीच्या सफाईसाठी १२०० कोटींचा खर्च…

दरम्यान, मिठी नदी नालेसफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे, कारण डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे हे जवळचे मित्र आहेत. दिशा सालियन हत्या प्रकरणात सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबईतील ड्रग्जच्या व्यवसायात डिनो मोरिया बदनाम आहे. मिठी नदीतील नालेसफाईबाबत ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यात अभिनेता डिनो मोरिया यांच्यावर आरोप ठेवण्यात आले.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे. असं निरुपम म्हणाले. दुसरीकडे गेल्या २० वर्षांत मिठी नदीच्या सफाईसाठी १२०० कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही मिठी नदीची पूर्ण सफाई झालेली नाही. या प्रकरणात मोठा घोटाळा झाला असून प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने ‘एसआयटीची नियुक्ती केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी…

गेल्या २० वर्षात १८ कंत्राटदारांना मिठी नदी सफाईचे काम दिले होते. २००५ पासून २०२२ पर्यंत महापालिकेत उबाठाची सत्ता होती. त्यांच्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कुणालाही मुंबईत कंत्राट मिळायचे नाही हे सर्वांना माहित आहे. या प्रकरणी पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल आणि दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. असे निरुपम म्हणाले.

मुंबईत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावर उतरुन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली होती. मात्र जेव्हा २००५ मध्ये मिठी नदीला पूर आला होता तेव्हा ठाकरे कुटुंब मुंबईच्या रस्त्यांवर फिरकले सुद्धा नाही. अशी टिका संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews