मुबंई- मकरसंक्रांतीसाठी राज्यभरात झालेल्या पतंगोत्सवानं अनेक कुटुंबांच्या घरावर संक्रांत ओढवली आहे. या उत्सवात राज्यात दोन लहान मुलांचा बळी गेला असून, दोन मुलं जखमी झाले आहेत. या घटनेमुळं राज्यात हळहळ व्यक्त होतेय. तर अनेक जण मांजामुळे जखमी झाले आहेत.
कोल्हापुरात लहानग्याचा बळी
कोल्हापूर जिल्ह्यात आजरामध्ये पतंग उडवत असताना लाडकाचा ओंडका डोक्यावर पडल्यामुळे १० वर्षांच्या आदर्श पोवार या लहानग्याचा मृत्यू झालाय. हा मुलगा मूळचा धाराशिवचा रहिवासी होता. त्याचे पालक मोलमजुरी करण्यासाठी कोल्हापुरात आले होते. अवघ्या १० वर्षांच्या चिमुरड्याचा असा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
अहिल्यानगरमध्ये दुसऱ्या लहानग्याचा मृत्यू
तर अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगावमध्ये मामाकडे आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. अर्णव व्यवहारे असं या मुलाचं नाव असून तो मूळचा पिंपरी चिंचवडचा रहिवासी होता.पतंग उडवण्यासाठी या मुलानं आणि त्याच्या मित्रानं मांजाऐवजी तारेचा वापर केला. या तारेचा पतंग उडवताना विजेच्या तारेशी संपर्क आल्यानं शॉक बसून अर्णवचा मृत्यू झालाय. तर त्याचा मित्र ऋषिकेश वाघमारे या १३ वर्षांचा मुलगा जखमी झालाय.
जळगावात मांजाने कापला गळा
तर जळगाव जिल्ह्यात मुलीला शाळेत सोडायला गेलेल्या महेश पाटील यांचा मांजामुळे गळा चिरला गेलाय. दुचाकीवरुन जात असताना धारदार मांजामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या गळ्यातून रक्त येत असल्याचं त्यांच्या मुलीला दिसलं त्यानंतर त्यांना दुखापत झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांच्यावर तातडीनं अंमळनेरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
मुंबईतही चिरला गळा
मुंबईतील बोरिवलीतील रहिवासी असलेले भारत कदम यांच्या गळ्याभोवती मांजा अडकल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. अंधेरी उड्डाणपुलावर ही दुर्घटना घडली. त्यानंतर त्यांनीच कुटुंबाला ही माहिती फोनवरुन दिली आणि ते रिक्षाने रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या श्वसननलिकेला खोलपर्यंत जखम झाली असल्याचं रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय.
मांजामुळे पक्षी आणि प्राण्यांनाही चांगलाच त्रास झालेला आहे. राज्यात झालेल्या पतंगबाजीत ५० पेक्षा जास्त पक्ष्यांना याचा फटका बसलाय. यात काही पक्ष्यांचा मृत्यू तर काही पक्ष्यांना दुखापत झालीय.





