Santosh Dhuri : ‘ठाकरे बंधू’ एकत्र मात्र शिलेदार गमावले; पक्षात फाटाफूट, संतोष धुरींनी मनसेतील ज्येष्ठ नेत्याला घेरलं

Written by:Smita Gangurde
Published:
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं, तरी नेत्यांमधील अस्वस्थता मनसेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Santosh Dhuri : ‘ठाकरे बंधू’ एकत्र मात्र शिलेदार गमावले; पक्षात फाटाफूट, संतोष धुरींनी मनसेतील ज्येष्ठ नेत्याला घेरलं

Santosh Dhuri joins BJP : राज आणि उद्धव ठाकरे हे दोन दुरावलेले बंधू आधी मराठीच्या मुद्द्यावरून एक झाले. मग मुंबई महापालिकेतल्या मतांच्या समीकरणानं त्यांना आणखी जवळ आणलं. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत ते एकत्र राहिले. पण याचा परिणाम असा दिसू लागला, की राज ठाकरेंसोबत अनेक वर्ष एकत्र राहिलेले शिलेदार साथ सोडू लागले. तर काहींच्या नाराजीची दबक्या सुरात कुजबूज सुरु झाली. या सगळ्यात मोठ्या वार केला तो भाजपत दाखल झालेल्या संतोष धुरींनी.

आम्ही जुन्या गोष्टी विसरलो मात्र ते काही विसरले नाहीत – संतोष धुरी

जागावाटप वेळी आम्ही कमी पडलो हे थेट वक्तव्य संतोष धुरी यांनी केलं आहे. त्यासोबतचं या जागावाटपामध्ये मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना का सामावून घेतल नाही असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेवेळी उपस्थित केला. जेव्हा ठाकरे बंधूंची युती झाली तेव्हा आम्ही खुश झालो. आम्ही जुन्या गोष्टी विसरलो मात्र ते काही विसरले नाहीत. पत्रकार परिषदेवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. संतोष धुरी यांच्याबरोबरच मनसेत सोडचिठ्ठी देणाऱ्यांची मोठी यादी दिसतेय. राजा चौगुले, हेमंत कांबळे, संगीता चेंदवणकर, विरेंद्र तांडेल यांनी पक्ष सोडलाय. तर राज ठाकरेंच्या जवळच्या काही लोकांच्या नाराजीच्या चर्चेनंही लक्ष वेधलंय…

मनसेतून कुणी भाजपच्या दारात जातंय, कुणी शिंदेंच्या शिवसेनेच्या. तर कुणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या. अशातच मनसेला संतोष धुरी यांच्या रुपी बसलेल्या मोठ्या धक्क्यावरुन स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनीही भाष्य केलंय. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं, तरी नेत्यांमधील अस्वस्थता मनसेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. एकेकाळी राज ठाकरेंसाठी जीवाचं रान करणारे शिलेदार आता रामराम ठोकू लागल्याने, मनसेच्या गडाला पडलेलं हे खिंडार राज ठाकरे कसं बुजवणार? आणि आगामी निवडणुकीत या नाराजीचा फटका नेमका कुणाला बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मनसे नेत्यावर जहरी टीका…

मनसेतून बाहेर पडल्यानंतर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संतोष धुरी यांनी मनसेतील ज्येष्ठ नेत्यावर जहरी टीका केली. ते म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर मी नाराज नाही. मात्र मनसेत अनेक कटकारस्थानी आहेत. त्यांचा राग विठ्ठलावर नाही तर तर बडव्यांवर आहे. मनसेतही अनेक बडवे आहेत. बाळा नांदगावकरदेखील तेच काम करतात, असा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. निवडणूक होण्यापूर्वी मनसेतून आणखी काही महत्त्वाचे चेहरे बाहेर पडतील, असंही ते यावेळी म्हणाले.