लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांना सरकारची दिशाभूल करत योजनेचा लाभ घेतल्याची बातमी नवी आहे. यामध्ये चक्क सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी देखील लाभ घेतला आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यभरातील 1183 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने सरकारला दिली. आता शासनाच्या कक्ष अधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना या बोगस लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारी कर्मचारी तरी योजनेचा लाभ
राज्यभरातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने सरकारला दिली. या कर्मचाऱ्यांवर नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, बोगस माहिती देत लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. लाभार्थी महिलांची स्क्रुटीनी होत असून दररोज नव्याने बोगस लाभ घेणारे लाभार्थी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 26 लाख लाभार्थी बोगस असल्याचे समोर आले होते.
एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची यादी सरकारने तयार केल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार, तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केली आहे, या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या 1 हजारपेक्षा जास्त महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बाब उघडकीस आली आहे.
अनेक लाडक्या बहीणी अपात्र ठरणार!
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात सध्या 2 कोटी 29 लाख महिलांना लाभ मिळत आहे. मात्र, एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांची छाननीचा निकष पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत. तर, जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनाही आता योजनेतून वगळण्यात येईल. दरम्यान अनेक लाडक्या बहीणींना योजनेतून वगळले जात असताना यामध्ये विरोधकांकडून मात्र टीका केली जात आहे. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूंनी पेचात सापडले आहे.





