मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे शहरासाठी जीवनदायिनी आहेत. सात धरणे मुंबईसाठी पाण्याची मुख्य स्रोत आहेत. या धरणांमधील जलसाठा शहरातील लाखो लोकांच्या दैनंदिन पाणी गरजा भागवतो. आता या धरणांतील पाणीसाठ्याबाबत एक महत्वाची अपडेट खरंतर समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने तानसा, भातसा या धरणांबाबत अपडेट आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार सर्व धरणे 99% भरली आहेत.
वर्षभराची पाण्याची चिंता मिटली!
मुसळधार पावसामुळं सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही प्रमुख धरणे 99.70 टक्के भरली असून मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे. दररोज तब्बल 4,000 मिलियन लिटर पाणी या सात धरणांतून मुंबईला पुरवले जाते. यात विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर (वैतरणा), उर्ध्व वैतरणा, भातसा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा या धरणांचा समावेश आहे. सात ही धरणे 99 टक्के भरली असून मुंबई करांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
हे ही वाचा
मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सध्याची पाण्याची गरज 4,600 मिलियन लिटरवर पोहोचली आहे. या तुटवड्याची पूर्तता करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने गारगाई धरण प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळं सहा गावे बाधित होणार असून त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाधित गावांची नावे अशी आहेत . ओगदा, खोडदा, फणसगाव, पाचघर, तिळमाळ आणि आमले. यापैकी ओगदा आणि खोडदा ही गावे पूर्णपणे धरणाच्या पाण्यात बुडतील.
मुंबई आणि परिसरात भरपूर पाऊस
मुंबई शहर आणि धरणांच्या परिसरात यंदा मुसळधार पाऊस झाला. शहराला वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित झाला आहे आणि पाणीटंचाईच्या चिंतेत दिलासा मिळाला आहे. मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक अडचण आणि पुराचा धोका यासारख्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या वर्षभर पुरेशा पाण्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतीसाठी आणि उद्योगांसाठीही पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल.